Monday, December 7, 2015

पन्नास पावसाळ्या नंतरचा जमाखर्च

                                    
        आईचं बोट धरून जेव्हा पहिल्यांदा बाहेरच्या जगात पाऊल  पडतं ते कदाचित निवृत्तीनंतर घरात परत येतं. नियती नावाची गोष्ट दरक्षणी एक नवा फासा टाकते. साप शिडीवरून चढत-उतरत सोंगटी एका जागी स्थिर होते. डाव पूर्ण होत नाही.  आता फक्त शेवटच्या दानाची वाट बघत बाकी सोंगट्याना घरंगळत उठत आपापला मार्ग चालताना पाहावं लागतं . पटावरून खाली बघितलं कि तेव्हाचे अजस्त्र साप आज फक्त एक साधारण दोरी वाटू लागतात. चढलेली शिडी एखाद्या शिखरापेक्षा उत्तुंग वाटू लागते. ज्याला highlights म्हणावे असे आयुष्यातले अनुभव  एक survey फॉर्म घेऊन समोर येतात.

१) शिक्षण पूर्ण ? :- होय
२) नोकरी धंदा ? :- होय
३) प्रेम ? :- कदाचित हो पण नक्की सांगता येत नाही,
४) प्रेमभंग? : एकूण एकच .
५) व्यसन ?:- हो / नाही काहीही
६) लग्न ? :- हो
७) लग्नाचा वाढदिवस (पहिला / दहावा / पंचविसावा) ? :- हो / कदाचित / बहुतेक
८) मुलं बाळं ? :- हो
९) त्यांचं शिक्षणपाणी आणि  लग्न  ? :- होयच मूळी
१०) कुटुंबा सोबत लांबचा प्रवास ? :- hmmmm (म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येईल एव्हढाच)
पन्नास वर्षांत आयुष्याच्या जमाखर्चात हेच १० प्रश्न. मग वहीमध्ये एक नवीन  उलटलं जातं. पण या पानावर हिशोब दुसराच कुणीतरी लिहित असतो. आपली कुणाला फारशी गरज उरलेली नाही हि जाणिव सुई सारखी काळजाला टोचून जाते. मग कधीतरी घर परतीची वाट  धरली जाते आणी मग  सगळंच बदलून जातं. हि वेळ असते दुसऱ्यांचा विचार करण्याची. पूर्वीच्या घटनांचे संदर्भ बदललेले असतात. कदाचित ते  आधीच बदलले  होते पण कळले  उशिरा.  कधीतरी वापरलेले शब्द आज तेच  संदर्भ घेऊन पण वेगळ्या स्पष्टीकरणा सकट परत आपल्याच अंगावरती आदळतात. जगाला खूष करण्याच्या नादात आपण आपल्याच माणसांची मनं नकळत दुखावलेली असतात. आत्तापर्यंत न जाणवलेलं काहीतरी जाणवायला लागतं.
"हम तो यूँ अपनी जिंदगी  से मिले, अजनबी जैसे अजनबी से मिले."

बुडत्याला काडीचा आधार या  न्यायाने मग जोडीदाराची आठवण होते. पण आत्ता आयुष्याची बसलेली घडी विस्कटण्यात कुणालाच रस नसतो. जुन्या जखमांवर ताजी फुंकर मारून फायदा नसतो हे कळून चुकतं. हो चुकतंच.अश्या वेळेला जुळवून घेणं महत्वाचं. जोडीदाराबरोबर, मुलांबरोबर सगळ्यांबरोबर एक नवीन खेळी खेळायला लागते. या वेळेला दान आपण टाकत नसतो सोंगटी पण आपली नसते. असतो तो फक्तं सहवास. साप येउदे किंवा शिडी, मी बरोबर आहे तुझ्या हा विश्वास द्यावा लागतो समोरच्याला. मग लुडबुड नं करता हि सल्लागाराची post मिळते. अभिमान असतो ६० पावसाळे पाहिल्याचा कुणालाही . पण प्रत्येक पाऊस  नवीन पाणी घेऊन येतो हे कळलं कि मग दान कुठलही पडूदे जिंकतो आपणच . आयुष्याच्या पानगळीत अहंची पानं गळून पडतात आणी ममं चे नवीन धुमारे फुटतात . प्रेम,अभिमान,कौतुक, विश्वास  या शब्दांना नवीन अर्थं येतो. एकला चलो रे चा ध्यास जाउन हात तुझा हातात असा साद येतो. नाना पाटेकरांचं एक सुंदर वाक्य आहे " माझं माझं म्हणून खूप करतो आपण, खरंतर जे काही तुमचं आहे ते माझंच कि तसंच जे काही माझं तेच तुमचं सुद्धा मग माझं म्हणजे नक्की काय? फक्त माझं म्हणून काही असेल तर सरतेशेवटी मी गेल्यानंतर तुमच्या डोळ्यातून एखादा थेंब जर आला तर तो माझा." आणी त्याच्याही वरती तुकाराम महाराज म्हणूनच गेलेत की ……
 "याच साठी केला होता अठःहास शेवटचा दीस गोड व्हावा."

Monday, November 16, 2015

कौनो ठगवा नगरीया लूटल हो

           एकदा चाललेल्या वाटे वरून  पुन्हा चालता येत नाही असं म्हणतात. वाट तीच असते पण आपण मात्र बदलले असतो. तारुण्याचे वयच असतं नविन वाटा तुडवायचं. पण परत त्याच वाटेवरून चालता येईलच असं नाही. आज मागे वळून बघताना हसायला येतं. कालच्या भाबडेपणावर हसावं कि आजच्या निगरगट्ट पणाची कीव करावी कळत नाही. हळवे असतात काही क्षण. भोळे निरागस आणि तितकेच मूर्ख सुध्दा. अशाच एका हळव्या क्षणी मी माझ्या मैत्रिणीला विचारलं होतं "तुझा शेवटचा क्षण कसा असावा असं तुला वाटतं ?" त्या वेळेला का हा प्रश्न विचारला माहित नाही. पण कुठली तरी कविता वाचून शेवटच्या क्षणाबद्दल काहीतरी काव्यात्मक सुचलं होतं हे खरं. बर माझी मैत्रीण म्हणजे माझ्यावर वरचढ. तिने मलाच याचं उत्तर पहिल द्यायला सांगितलं. मी म्हटलं "धो धो पाऊस पडत असावा आणि मृत्यू ने एका सुंदर तरुणीच रूप घेऊन माझ्यापुढे यावं आणि म्हणावं चल मी तुला न्यायला आलेय. बस तोच शेवटचा क्षण असावा." बापरे आज आठवताना पण शरम वाटतेय. किती मूर्खपणा करावा माणसाने? पण मैत्रिणीला त्याची फिकीर नसावी. एखादी गोष्ट ऐकल्याप्रमाणे तिने माझं ऐकून घेतलं. आणि मग ती बोलायला लागली. "मला काय वाटतं माहित आहे ? माझ्या आयुष्याच्या शेवटी मी सुवासिनी असावी. मला नवरीच्या लाल कपड्यात सजवलेलं असावं. हातात बांगड्या कपाळावर कुंकू आणि सगळीकडे चंदनाचा वास. तो वास घेत घेतच मी शेवटचा श्वास घ्यावा."
             "च्यायला! ही तर माझ्यापेक्षा भारी निघाली." मी मनात म्हटलं. पण मनात असून सुद्धा मला तिच्यावर हसता नाही आलं. ती बोलत असताना तिचे चमकणारे डोळे मी कधीच विसरू शकलो नाही. ती जे काही बोलत होती ते मनापासुन बोलत होती. कुणीतरी भूल टाकून भारावलेला क्षण होता तो. त्या मंतरलेल्या क्षणाची जादू हसून झटकून टाकायची हिम्मत नाही झाली माझी. 
             आज अचानक तो क्षण चाल करून आला माझ्यावर. निमित्तं होतं कबीराच. त्याचा एक दोहा ऐकताना मी गाफील पकडला गेलो. 
               कौनो ठगवा नगरिया लूटल हो । चंदन काठ ही बनल खटोलना । 
                का करु दुलहिन सुतल हो । ठगवा नगरिया लूटल हो । 
       खरं तर या सुरुवातीच्या ओळीं पासूनच मी अडकायला सुरुवात झाली होती. जनरली माणूस मेल्यावर असंच काहीतरी माणसं बोलत असतात. दोष देतात नशिबाला, देवाला कुणालाही. म्हणूनच कुण्या चोराने लुटलेल्या नगरीची कहाणी मला गुंतवत गेली. चंदनाच्या काठीचा पाळणा म्हणजे चिताच. मला वाटलं मला बरोबर समजतोय कबिर. पण शेवटी संतांचा संत तो, पुढच्याच ओळी मध्ये पार भुइसपाट  केलं त्याने मला. म्हणे नवरीला झोपण्यासाठी म्हणुन  हा  चंदनाचा पाळणा.  फक्त ३-४ ओळी मधेच डोळ्यापुढे सगळं चित्रं उभं राहिलं माझ्या. त्याच्या पुढच्या ओळींनी तर अजूनच खिंडीत गाठलं मला. 
               उठो री सखी मोरी मांग सावरो । दुल्हा मोसे रूठल हो ।
               आये यमराज पलंग चढी बैठे । नैनन असुवा छुटल हो ।
   श्रुंगार हा जणू स्त्री जीवनाचा अविभाज्य भाग असावा. आपल्या अखेरच्या क्षणी नवऱ्याने नाही तर सखीने तरी तिच्या भांगेत कुंकू भरावं हि तिची इच्छा कुठल्या ओढीतून आली कुणास ठाऊक ? पण हीच कुंकवाची रेघ गेल्या शतकातल्या बाईला माझ्या आजच्या काळातल्या मैत्रिणीशी अलगद जोडून घेते हेच कदाचित कबीराच यश असावं. शेवटची ओळ वाचताना माझ्या मैत्रिणीचे पाणीदार डोळे आठवून अजूनही जीव कासावीस होतो. 
               चारी जने मेरी खाट उठाईन  । चहु दिशि धुं धुं ऊठल हो ।
                कहत कबीरा सुनो भाई साधू । जगसे नाता छुटल हो ।
   तसं बघितलं तर फक्त एका अंत यात्रेचं हे वर्णन असेल पण अजूनही अंगावरून सर्रकन काटा उमटून जातो. आज हा दोहा ऐकताना मला स्पष्ट अस्पष्टपणे माझ्या मैत्रिणीची भावना जाणवते. काळजात आत कुठे तरी हलल्या सारखं वाटतं आणि परत एकदा त्याच जुन्या आठवणीच्या रस्त्यावरून जावंसं वाटतं. पण मगाशीच म्हटलं न मी,  एकदा चाललेल्या वाटे वरून पुन्हा चालता येत नाही

Friday, November 6, 2015

काही ओळखीच्या स्त्रिया

                                                              काही ओळखीच्या स्त्रिया
                 "वाट पंढरीची बाई कशी झाली ओली ? नाहत होती रुख्मीणी केस वाळवीत गेली ." दोनच ओळी पण एक नविन जग डोळ्यासमोर उलगडणारी . आपल्या लोकगीतांची पण कामालाच आहे. किती सामर्थ्य आहे यांच्यात? एक मोहक क्षण आपल्याला स्पर्शुन जातो. त्या पंढरपूरच्या विठ्ठला मागे हि रुख्मिणी धावत गेली खरी, पण त्या विठोबाला तिची खबर होती कि नाही कोण जाणे. आपला इतिहास पण अश्याच रुख्मिणींच्या जिवावर जगू पाह्तोय. आत्ताच नाही पण शेकडो हजारो वर्षा पासून.
मागे एकदा मी माझ्या मैत्रिणीला विचारला होतं "का करतात माणसं लग्न?"
" Because we need a witness in our life. " ती म्हणाली होति.
अरे किती माणसं आहेत जगात. कुणाकडे लक्ष द्यायला वेळ तरी आहे का आपल्या कडे ? आणि लग्न म्हणजे तरी नक्की काय तर आपण दुसरया व्यक्तीला सांगायचं कि मी लक्ष देईन तुझ्या कडे . Your life wont go unnoticed because I will be your witness.
तेव्हा का माहित नाही पण पटलं होतं मला ते. पण परवा अजिंठ्याच्या लेण्यामध्ये यशोधरेच  शिल्पं पाहिला आणि मला स्वतः लाच भरून आलं एकदम. दारात बुद्ध उभ. हो बुद्धच. तिचा सिद्धार्थ तर कधीच गेला होता तिला सोडून. तिच्या डोळ्यात म्हटलं तर ओळख आहे म्हटलं तर नाही असे भाव. तो चिमुरडा राहुल तर भांबावूनच पाहतोय या माणसाकडे. आणि तो सर्वज्ञानी गौतम बुद्ध अलिप्त नजरेने पाहतोय त्यांच्याकडे. मला नाही आवडलं. असेल तो ज्ञानी. मिळवलाहि असेल त्याने त्याच्या मोहावर विजय पण म्हणून डोळ्यात जराही अपराधीपण दिसू नये? जी मुलगी त्याच्या आयुष्यात आपले मागचे सर्व बंध तोडून आलेली, तिच्याकडे पाठ फिरवताना जराही हललं नसेल का त्याच्या हृदयात ? आणि आता परत येउन काय मिळवला त्याने ? हे सगळा मनात आलं आणि मग उडूनच गेला माझं मन त्या अजिंठ्यामधून. मग हळूहळू लक्षात आलं कि यशोधरा एकटीच नाही. अजून बऱ्याच सोबतिणी आहेत तिच्या. ती राधा,ती सीता झालच तर म्हाळसा द्रौपदी आणि अश्या बऱ्याच जणी. आपण मार मजेत म्हणतो कि प्रेमात कसली अपेक्षा करू नये. अरे मान्य आहे न मलापण. मग ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केलं तिने असा स्वार्थीपणा का करावा ? रामाने सीतेवर प्रेम केलं आणि मग जंगलात नेउन सोडून दिलं. द्रौपदीचे तर पाच पाच नवरे पण एकालाही तिची कदर असू नये? कदाचित हीच काहीशी अपराधी जाणीव आपल्या लोककलाकारांना आणि संतांना झाली असेल. त्यातून जे जन्माला आलं ते अभिजात वाङ्मय . एक प्रकारचा काव्यगत न्याय दिला गेला या बाईंना . त्यांच्या भाव भावना उघड्यावर आल्या . घराघरात पोहोचल्या आणि मग लोक म्हणू लागले "कर्णाला पाहुन द्रौपदिच मन पाकुळल." कुणीतरी जनाबाई विठ्ठलाला धरून कामं करून घेते. तर कुणी त्या सावळ्याला बांधून ठेवते. या माझ्या मैत्रिणींच्या जखमेवर फुंकर मारतात हि लोकगीतं. म्हणून आज मी त्यांना म्हणू शकतो, Your life won't go unnoticed.Never ever again.