Saturday, December 30, 2017

प्रिय वैष्णवी,

प्रिय वैष्णवी,
आज चुकून पहाटे डोळा उघडला. बाहेर मस्त थंडगार वारा सुटला होता. कशी कोण जाणे पण तुझी आठवण आली मला. थंड हवेत तुझा चेहरा एकदम वेगळाच दिसतो. डोळ्यातून हसणं तू कुठून शिकलीस माहित नाही, पण तुझे डोळे बघितले कि खूप उबदार वाटतं मला. हे वाचून तू परत डोळ्यातल्या डोळ्यात खुदकन हसशील हे माहित आहे मला. कदाचित तू तसा हसावस म्हणूनच हे लिहिलं गेलं माझ्याकडून. खूप निरागस आहेस तू. माझ्या पिल्ला एवढीच. तसं बघायला गेलं तर मी तुला पण माझं पिल्लूच समजतो. फरक एवढाच कि माझी पिल्लू लहान आहे आणि तू तिच्या पेक्षा लहान आहे. असं असून सुद्धा आज एक गोष्टं विचारावीशी वाटत आहे. जर जमलं तर उत्तर दे. नाहीतर नेहमीसारखी हसून दाखव आणि मी नेहेमी सारखंच सगळं विसरून जाईन.
आपली लुटुपुटीची भांडणं तुला नवीन नाही. पण खरी भांडणं कधीकधी मोठी होत जातात. शब्दाने शब्द वाढतो. का कुणास ठाऊक पण एक पाउल मागे सरावं असं कुणालाच वाटत नाही. मग भडका उडतो. कळत नकळत आपल्या आजू बाजूची माणसं त्यात सामील होतात. गट बनतात. समोरच्याचं कसं आणि काय चुकलं हे आपण नं विचारता आपल्याला सांगितला जातं. मागे कधीतरी घडून गेलेल्या गोष्टींना पण आत्ताच्या भांडणाचा संदर्भ लागू पडतो आणि मग माघार घेणं शक्य होत नाही. खरं सांगतो बाळ खूप अवघड वेळ असते हि. आणि अश्या वेळेला तुम्हाला समोरची व्यक्ती आणि तुमचा अहंकार यात निवड करावी लागते. You may win an argument but you might lose the person. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अश्या वेळेला आपल्या माणसाची निवड करणं याच्यासारखी मजा नाही. कारण काहीही झालं तरी दान तुमच्याच बाजूने पडलेलं असतं.
सरलेल्या काळाने मला शिकवलं कि चांगलं वाईट खरं खोटं असं काही नसतंच मुळी. चांगलं आणि वाईट याची व्याख्या आपल्या मनाप्रमाणे बदलतो आपण. मग कधी कधी वाटतं का खोटं बोलतो आपण. जे काही आपण करतो ते चुकीचा आहे हे आपल्याला माहित असतं तेव्हा खोटं बोलतो आपण आणि जर आपल्याला माहित आहे कि जे करतो ते चूक आहे ते का करतो आपण? या प्रश्नांनी मस्त भुगा केला होता माझ्या डोक्याचा. मग एका क्षणी ठरवलं मी कि जे मनाला पटतं तेच करायचं. जे केलं ते चूक कि बरोबर हे येणारा काळ ठरवेल. आणि चूक झाली तर झाली. जर चूक करताना घाबरलो नाही तर कबूल करताना लाज का वाटावी.
खरं सांगायचं तर हे सगळं मी तुझ्याकडून आणि माझ्या पिल्लाकडून शिकलो. कुणाची पर्वा नं करता मनाला जे पटेल ते करायला वेगळीच जिगर लागते. आधी वाटायचं कि पिल्लू लहान आहे म्हणून असं वागणं तिला जमतं. पण तू सुद्धा ते तितक्याच सहजतेने करतेस की. मला मनापासून असं वाटतं कि पिल्लू तुझ्याएवढी झाल्यावर पण तुझ्या इतकीच निरागस आणि हुशार असेल.
....आणि त्याकरता तू कुठली गोळी किंवा औषध घेतेस तेवढं फक्तं मला सांग. बस एवढंच विचारायचं होतं तुला.

Friday, July 14, 2017

रूम-मेट्स

रूमचं दार उघडून अनघा बाहेर आली तर तिला निनाद सोफ्यावर मेल चेक करताना दिसला.
“गुड मोर्निंग.” अनघा त्याच्याकडे हसत बोलली.
“वेरी गुड मोर्निंग princess” तीला एक नाटकी सलाम ठोकत निनाद ने प्रत्युत्तर दिले.
“कधी आलास?” आपले मोकळे केस बांधत अनघाने विचारलं.
“आत्ता just आलो. तू ये फ्रेश होऊन. मी चहा बनवतो तोपर्यंत.”
“ओके बॉस” म्हणत अनघा फ्रेश व्हायला गेली. आंघोळ करून ती बाहेर आली तोपर्यंत निनाद साहेब चहाचे कप टी-पॉय वर मांडून सोफ्यावर पाय पसरून आडवे झाले होते.
खुर्चीवर बसत तिने चहाचा घोट घेतला.
“ह्म्म्म, मस्तं झालाय चहा” ती समाधानाने उद्गारली.
“Thanks” अर्धवट डोळे उघडत तो उठून चहा पिऊ लागला.
“सिगरेट आहे तुझ्याकडे? माझ्या काल रात्री संपल्या.” तीने विचारलं.
त्याने काहीही नं बोलता खिशातून पाकीट आणि लायटर काढून टेबलावर तिच्याकडे सरकवलं.
“Thanks. तू नाही घेणार?” आपली सिगारेट पेटवत तिने विचारलं.
“नाही गं. आत्ता येता येता रफिक चं हॉटेल उघडं दिसलं. मस्तं डबल हाफ फ्राय खाल्लं, एक मलाई मारके चहा घेतला. शांतपणे एक सिगारेट मारली आणि मग आलो वर. आणि हो, तुझ्याकरता भुर्जी आणली आहे पार्सल करून. फ्रिजवर ठेवली आहे. खाऊन घे नंतर.” निनाद ने उत्तर दिलं.
“क्या बात है? आज खूप खातिरदारी करतोय तू माझी? चहा, सिगरेट, भुर्जी. काय स्पेशल?”
“बस काय यार. सहजच केलं मी. त्यात काय विशेष”
“मस्करी केली रे. ते जाऊदे. काल काय खूप काम होतं ऑफीसमध्ये? खूप दमल्यासारखा वाटतोस म्हणून विचारतेय.” अनघाने काळजीने विचारलं.
“काम होतं खरंतर खूप. पण ते काय चालूच असतं. थोडंसं अनईझी वाटतंय एवढंच.”
“ठीक आहे रे. आता इतक्या दिवसांनी नाईट शिफ्ट करतोयस म्हणून होतंय असं. आता सवय नाही राहिली तुला नाईटची. बाकी काही नाही.” अनघा म्हणाली.
  “तसंच असेल कदाचित. आणि तसंपण आज आणि उद्या वीक ऑफ आहे मला. आणि नंतर जनरल शिफ्टमध्ये आहे मी.” निनाद ने तिला सांगितलं.
“असं असेल तर खूप चांगलं आहे. बरं चल मी आवरून घेते आता. खिचडी बनवून ठेवते. दुपारी खाऊन घे.”
“अगं नको! मी घेऊन येईन खालून काहीतरी.” निनाद लगेच बोलला.
"चुतियागिरी नको करूस. एकतर आधीच तब्येत बरी नाही त्यात बाहेरचं खात बसलास तर अजून आजारी पडशील.” अनघा जवळ जवळ ओरडलीच त्याच्यावर.
“अरे मातोश्री ऐका माझं” निनाद हात जोडत तिला म्हणाला “पहिली गोष्टं म्हणजे मी आजारी नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्टं अशी कि मला थंडगार खायला नाही आवडत. वाटलं तर माझं मीच काही तरी बनवून खाईन. तू  टेन्शन नको घेउस.”
“बरं ठीक आहे. बघू आपण. मी ऑफिसची तयारी करते तू पण आराम कर.” जराशी शांत होत अनघा म्हणाली.
“ओके. एकदोन मेल्स पाठवायचे आहेत. तेवढे पाठवतो आणि झोपतो.” निनाद उठून laptop उघडत म्हणाला.
अनघा तिची तयारी करायला बेडरूम मध्ये गेली तसा निनाद गाणी लावून मेल्स चेक करत बसला. किचन आवरून नाश्ता वगैरे आटपून अनघा ऑफिसला जायला निघाली तर निनाद laptop तसाच छातीवर ठेवून सोफ्यावरच झोपला होता. तिने हळूच laptop टेबलावर ठेवला. तशीच परत बेडरूम मध्ये जाऊन अनघा ने एक जाड रजई  आणली आणि निनाद च्या अंगावर अलगद पसरली. निनाद लहान बाळासारखा गाढ झोपला होता. त्याच्या केसांमधुन हात फिरवायचा तिला मोह झाला. तिने हात उंचावला देखील होता, तेवढ्यात निनादच्या मोबाईल च्या आवाजाने ती दचकली. निनाद पण धसकून जागा झाला. डोळे उघडले तर समोर अनघा हात उंचावून मारायच्या अविर्भावात उभी.
“काय झालं?” त्याने विचारलं
केस विस्कटलेला, जागरणामुळे लाल झालेले डोळे तिच्याकडे वटारून पाहणारा  निनादचा चेहरा बघून अनघाला खुदकन हसूच फुटलं.
“काही झालेलं नाहीये. फोन वाजतोय तुझा फक्तं.”
“शिट यार! हे ऑफिस वाले साले शांतपणे झोपू पण देत नाही.कसली मस्तं डुलकी लागली होती माहितीये?”  निनाद वैतागत म्हणाला.
“चांगलंच माहिती आहे.” त्याच्या हातात फोन देत अनघा म्हणाली. “बरं मी निघते आता. खाली रेणुका बाईंना सांगून जातेय मी. दुपारी डबा पाठवतील त्या. खाऊन घे आणि आराम कर. कुठे भटकायला जाऊ नकोस.”
तिच्या प्रत्येक वाक्याला हो-हो  म्हणत निनादने फोन घेतला.
“चल येते म्हणत अनघाने हलकेच त्याच्या गळ्यात मागून हात टाकला, आणि त्याच्या केसांवर ओठ टेकून ती मागे फिरली. बिल्डिंग मधून बाहेर पडताना सवयीप्रमाणे तिने वर खिडकीकडे पाहिलं तर नेहेमीसारखाच आजपण निनाद तिला खिडकीतून हात दाखवत बाय करत होता. फरक इतकाच कि आज तो फोन वर बोलत होता. त्याला हसून हात दाखवत अनघा गाडीत बसली.


संध्याकाळी चावीने दार उघडून अनघा आत आली तेव्हा चेरी आणि निनाद सोफ्यावर गप्पा मारत बसले होते.
“हाय चेरी. कशी आहेस” पायातल्या चपला सरकवत अनघाने विचारलं.
“एकदम मजेत.” अनघाला मिठी मारत चेरी म्हणाली “तू कशी आहेस?”
“जिवंत आहे अजून” नाटकी उसासा सोडत अनघा म्हणाली “तू बस ना.”
“नाही नको. निघते मी” पर्स खांद्याला लावत चेरी म्हणाली.
“अरे तुमचं काही प्रायव्हेट बोलणं चाललं असेल तर आत जाते मी. नो प्रॉब्लेम.” निनाद कडे बघत अनघा बोलली.
“तसं काही नाही गं. तुझीच वाट बघत होते. म्हटलं तुला भेटूनच जाईन. मकरंद पण येतंच असेल इतक्यात.” अनघाचा हात धरत चेरी म्हणाली.
“बस गं. बरेच दिवस भेटले नाही तुम्ही लोकं. पाहिजे तर मक्याला पण बोलवून घेऊ इथेच. उद्या तशीपण सुट्टी आहेच. थोडे ड्रिंक्स घेऊ. जेवा आणि जा आरामात. वाटलं तर इथेच राहा आज. काय घाई आहे.” अनघा आग्रह करत बोलली.
“अनु जाऊदे तिला. नको जबरदस्ती करूस.” इतका वेळ गप्पं बसलेला निनाद मधेच म्हणाला.
“अं....नको. नंतर कधीतरी पार्टी करू आपण. आय प्रॉमिस. आज निघते मी.” चपला घालत चेरी म्हणाली.
“ठीक आहे. नीट जा” चेरीला मिठी मारून अनघा म्हणाली “आणि काळजी घे स्वतःची.”
अनघाच्या बदललेल्या टोन मुळे चेरी जराशी चमकली.
“नक्की.” स्वतःला सावरत चेरी म्हणाली. “चल निनाद येते मी.”
निनाद तोपर्यंत दरवाजात आला होता.
“मी येऊ सोडायला?” त्याने विचारलं.
“नको रे! जाईन मी एकटी.” निनादला आलिंगन देत ती हलकेच त्याच्या कानात पुटपुटली
“Thanks फॉर एवेरीथिंग.”
“ठीक आहे गं.” हलकेच तिची मिठी सोडवत निनाद म्हणाला “नीट जा. आणि पोहोचल्यावर एक मेसेज टाक.”
“नक्की टाकते. चल बाय. बाय अनघा. येते मी.” म्हणत चेरी गेली देखील.
“आज लेट झाला तुला?” दरवाजा लावत निनाद ने विचारलं.
“हो रे. आज ट्राफिक लागला थोडासा.” बांधलेले केस मोकळे करत अनघाने उत्तर दिलं.
“चहा घेणार. आत्ताच बनवला होता चेरीने. थोडासा जास्तच केलाय तिने आपल्या सेकंड राउंड करता म्हणून.”
“घेऊया की. आयता चहा कोण सोडेल.” अनघा हसत हसत म्हणाली.
“मग मला पण एक कप ओतून आण ना. प्लीज प्लीज प्लीज.” निनादने नाटकी विनवणीच्या स्वरात अनघाला विचारलं.
“फटके द्यायला पाहिजे तुला.” त्याच्या हातावर एक चापटी मारत अनघा म्हणाली. “बस. आणते.”
चहाचे कप घेऊन अनघा बाहेर आली तेव्हा निनाद सिगरेट पीत बसला होता.
“तुझी सिगरेट आहे तुझ्याकडे?” तिच्या हातातून कप घेत निनादने विचारलं.
“हो आहे.” आपली सिगरेट पेटवत अनघाने विचारलं “चेरी ची तब्येत थोडी डाऊन वाटली ना?”
“माहित नाही गं. मी काही नोटीस नाही केलं.” तिची नजर चोरत निनाद म्हणाला
“हो का?” खट्याळ स्वरात अनघाने विचारलं “बरं कितवा महिना चालू आहे तिचा?“
निनादच्या तोंडातून चहा फुर्र करून बाहेर पडला. ठसका लागून तो जोरजोरात खोकू लागला.
“अरे हळू जरा हळू“ म्हणत अनघा पटकन उठून त्याची पाठ ठोकायला लागली वरून तोंडाने हळू-हळू असं जप चालूच होता. थोडासा सावरल्यावर त्याने तिचा हात झटकून टाकला.
“अगं ए बाई. थोडं हळू थोपट ना.” तो जवळ जवळ खेकसलाच तिच्या अंगावर.
“तुला च्यायला असंच ठोकायला पाहिजे. काय तर म्हणे माहित नाही गं. मी काही नोटीस नाही केलं.
तुला काय मी चु ....” निनादच्या चेहऱ्याकडे बघून तिने शब्द फिरवला “चु चुकीची वाटले. सांगायचं नसेल तर स्पष्ट बोल ना. खोटं कशाला बोलतोस.”
“शांतं हो माते शांत हो.” निनाद तिच्यापुढे गुडघ्यावर हात जोडून बसला. “लेकराची चुकी पोटात घे माई. आई तुला रविवारी बोकड खायला घालेन” असं म्हणता म्हणता तो नाटकीपणे घुमायला लागला “झालंच तर २ बाटल्या बिअर पाजेन पण तू शांत हो.”
“उठ भक्ता देवी प्रसन्न झालेली आहे. फक्त रविवारी नवस फेडून टाक म्हणजे झालं. साला नौटंकी.”
दोघेही हसतच परत सोफ्यावर बसले.
“तुला कसं कळलं?” निनाद ने तिला विचारलं.
“बाईची नजर. अजून दुसरं काय?” तिने मगाशी घेतलेलं बेअरिंग अजून सोडलं नव्हतं.
“सरळ सांग कसं कळलं ते. शो बाजी नको करूस.” तो जवळपास ओरडलाच.
“चेरीला मागे एकदोन वेळा चक्कर आणि उलटीचा त्रास झाला होता हे तूच सांगितलं होतं मला.”
“पण चक्कर तर कशानेही येऊ शकते ना?” निनाद ने मधेच तिला तोडायचा प्रयत्न केला.
“मला पण काही विशेष वाटलं नाही त्यात. पण आज ती आल्यावर तू सिगरेट नाही प्यायलास.”
“आणि हे कसं कळलं तुम्हाला?” निनाद ने विचारलं
“कारण तू ash-tray सोफ्याखाली सरकवला होतास. जो तू आत्ता बाहेर काढलास. शिवाय मी ड्रिंक्स चं नाव काढल्यावर तिचं उतरलेलं तोंड सगळंच सांगून गेलं मला. आणि महाशय तुम्ही सोडायला निघाले होते तिला. तुझ्याकडून इतकं स्त्री-दाक्षिण्यं म्हणजे जरा अतीच झालं नाही का.”
निनाद ने कोपरापासून हात जोडले.
“अनघा बाई तुम्ही ग्रेट आहात. तू डिटेक्टीव का होत नाहीस गं. शेरलॉक होम्स पेक्षा जास्तं केसेस भेटतील तुला”
“हो आणि मग तू एक पुस्तक लिही डिटेक्टीव अनु आणि निनू  
इतकं बोलताना अनघाला खुदकन हसू फुटलं. निनाद ने जोडलेले हात तसेच टाळी साठी तिच्या पुढे केले. ते हात तसेच धरून दोघेही खदाखदा हसत सुटले.


Sunday, April 30, 2017

साद


साद 

माझ्या आजोबांना एक सवय होती, ते कुठल्याही लहान मुलाला 'देवा' अशी हाक मारायचे. खूप गम्मत वाटायची त्या गोष्टीची. त्यांची ती हाक ऐकण्यासाठी म्हणून मग मी मुद्दाम लपून बसायचो कुठेतरी. घराच्या एखाद्या अनोळखी कोपऱ्यात दडून त्यांची हाक ऐकण्यामध्ये एक अपूर्व असा आनंद होता. या म्हाताऱ्या लोकांच्या आवाजात काय जादू असते कळंत नाही. सतत मुरत असलेल्या मुरंब्याची गोडी असते त्यांच्या स्वरात. त्यांच्या स्वरांची जादू असेल किंवा त्या शब्दाची असेल पण कसलीतरी भूल पडत होती त्या वेळी. वयात आलो. जगाचे भले बुरे अनुभव घेतले, बऱ्या प्रमाणात पुस्तकं वाचली, पण ती जादू कसली होती हे काही उमगलं नाही. मग आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर एका मन नावाच्या गोष्टीचं अस्तित्व जाणवलं. कुणाची तरी हाक ऐकल्यावर काळजाला झालेली जखम अजूनही ताजीच राहिली आहे. आपलं नाव इतकं सुंदर आहे याचा पहिल्यांदा साक्षात्कार झाला होता तेव्हा. मग त्या जखमेला गोंजारायला आवाजाचे जादूगार सोबतीला येऊन विसावले. शब्दांच्या किमयागारांनी त्यांना तितकीच तोला-मोलाची साथ दिली. हळू-हळू शब्दांची, आवाजाची जादू उलगडायला लागली. शब्दांनी सुखावलं, आवाजांनी दुखावलं, कुणी अहंकार जोपासला तर कुणी भयंकर अपमान केला. पण मग त्या शब्दांचे त्या आवाजांचे अर्थ नव्याने उलगडू लागले. पंजाबी ट्रक ड्रायवर ने पोटतिडकीने दिलेल्या शिव्या ऐकल्यावर मनमुराद हसलो होतो मी. फाटक्या भिकारणीच्या तोंडून 'बाबूजी' आवाज ऐकून तिच्यापेक्षा फटका झालो होतो मी.

एकदा सखी गप्पांच्या ओघात बोलून गेली सहज, "हे शब्द, सूर, आवाज वगैरे काहीही नसतं रे. त्या शब्दाला तुझ्या मनाची जोड असली ना कि सगळंच छान वाटतं ऐकायला, अगदी शिव्या सुद्धा." सखीचं हे असंच असतं. बोलता बोलता असा यॉर्कर टाकून जाते ती. माझ्या डोक्यात मग जो काही चरखा सुरु झाला तो झालाच. किती वायफळ बोलत असतो आपण. उत्तराला प्रत्युत्तर या पलीकडे त्याला काही अस्तित्व तरी असतं का ? मनापासून मनातलं बोलायला आपण कधी शिकलोच नाही बहुतेक. सराईत नटाच्या तोंडावर एक हसरा मुखवटा  सतत असतो तसाच एखादा बुरखा तर आपण चढवून नाही बसलो ना या विचाराने तर हैराण केलं होतं मला कित्येक दिवस. पण मग याची दुसरी बाजू पण उमजायला लागली. गुलजार सारखा एखादा कलंदर जेव्हा "वो आके पेहलू मे ऐसे बैठे के शाम रंगीन हो गयी है" असं जेव्हा लिहून जातो तेव्हा ते सुंदर शब्द, ती तालबद्ध लय या पलीकडे जाऊन गुलजारचं आतलं मन उजळून निघतं. जगजीत च्या आवाजात "चिट्ठी ना कोई संदेश" ऐकताना त्याच्या हृदयाला पडलेला पीळ जाणवतो अगदी आतपर्यंत. मग वाटतं या भावनाच तर बहाल करत नसतील आपलं सौंदर्य त्या शब्दांना. शेवटी तुमचे शब्दं, तुमचा आवाज हे सुद्धा एक अभिव्यक्तीचं माध्यमच आहे की. तुम्ही व्यक्तं होणं आणि समोरच्याने  ते उमजून घेणं यालाच कदाचित संवाद (सह:वाद)म्हणत असावेत. परवाच आईने मला मारलेली हाक ऐकून  माझ्या इवलुश्या पिल्लाने  तिच्या बोबड्या आवाजात मला साद घातली होती. लगेच सखीला फोन करून सांगितलं होतं मी कि पिल्लूचा आवाज अगदी तुझ्या आवाजासारखा आहे म्हणून.

"देवा !!!" तीच्या तोंडातून शब्द उमटला. मला आजोबांची आठवण झाली. म्हटलं चला, एक वर्तुळ पूर्ण झालं









Sunday, March 26, 2017

स्वरांजली


पहाट आणि रात्र या मधली वेळ. कशी कुणास ठाऊक आज अश्या अवेळी जाग आली तिला. कूस बदलून पाहते ती, पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. झोपडीचं दार उघडून ती बाहेर येते. आकाशात तारे मंद चमचमत आहेत. पहाटेच्या वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा येतो. पदर गच्च आवळून घेत ती चालू लागते. कुठे जायचंय ठाऊक नाही पण ती चालू लागते. पहाटेच्या दवात भिजलेली मऊशार माती तिच्या पायाला पावलागणिक माखतेय. कसलास धुंद सुवास पसरलाय चहूकडे. त्या सुवासाने तिची आठवण जरा चाळवते. चंदनाचा सुवास. तिच्या मनात भरलाय तो वास.  आठवणींच्या कपाटात ती धुंडाळतेय काहीतरी. आणि अचानक गवसते तिला ती नेमकी स्मृती. तो मातीचा नाजूक स्पर्श हा त्या कृष्णाच्या स्पर्शासारखाच आहे की. त्या स्पर्शानेच तर नाहीसं केलं होतं तिचं कुबड. 
कुब्जा! सर्वांगाला कुबड असलेली म्हणून ती कुब्जा. पण त्या कुबड्या शरीरात कमालीची जादू होती. कंसासारखा राक्षस सुद्धा विरघळून जायचा तिच्या हस्त-स्पर्शाने. आवडती दासी होती ती कंसाची. त्याला चंदनाचं लेपन करायची अनुमती फक्तं तिलाच होती. बरं चाललेलं होतं की तिचं. आणि मग कुठूनसा तो सुकुमार कृष्ण गवसला तिला वाटे मध्ये. 
"तुझी कीर्ती ऐकून आहे मी कुब्जे. फक्तं एकदा मला तुझ्या हाताने चंदनाचा लेप लावशील ? " त्याने विचारलं होता तिला. 
खास कंसाकरता बनवलेला लेप घेऊन ती तशीच माघारी फिरली होती तिच्या झोपडीकडे. मागोमाग कृष्ण येताच होता. त्याला लेप लावताना हरपून गेली होती ती. आजपर्यंत अनेकदा गंधाळली होती तिने अपरिचित शरीरं. पण हि अनुभूती काही तरी वेगळीच होती. पुरुष स्पर्श नवा नव्हता तिला. वासना, लाचारी, क्रूरता सारं काही अनुभवलं होतं तिने या आधी पण आपुलकी नव्हती जाणवली कधी तिला. प्राजक्ताच्या कळीसारखा नाजूक असा कृष्ण तिच्याकडून लेप लावून घेत होता. कधी तो हुंकारात होता तर कधी तृप्तीची साद देत होता. एका आवेगाच्या क्षणी डोळे मिटून घेतले त्याने आणि तिने भरून घेतलं होतं त्याचं कोवळेपण डोळ्यामध्ये. 
"कुब्जे फार अलौकिक अनुभव दिलास तू मला. मी काय मोबदला देणार तुला याचा? तरीही माग तुला हवं ते. प्रयत्न कारेन मी देण्याचा"

विचारांच्या भरात ती कधी नदीकिनारी आली तिलाही समजलं नाही.कुठल्यातरी मंजुळ स्वरांनी भारून टाकला होता तो नदीकाठ. पाण्यात पाय भिजवत ती भोगत होती तो  अनुपम नाद.  त्या सुंदर क्षणांच्या साथीने तिने मोकाट सोडलं आपलं मन भूतकाळामध्ये. 

"मी तरी काय मागू कृष्णा तुला. पण तुझ्या बासरी बद्दल खूप ऐकलंय मी. हरकत नसेल तर ऐकवशील तुझा पावा मला ?" तिने विचारलं. 
"भ्रम आहे कुब्जे तो लोकांचा . एका शुष्क वेळूच्या छिद्रातून वाहणारा वारा एवढंच या आवाजाचं स्वरूप. तो नाद येतो तो या काळजातून. मनाच्या कोपऱ्यातली कुठलीतरी जखम अशी या बासरीतून बाहेर पडते. ती फुंकर या वेळूवर नाही, माझ्या मनावर घालतो मी. अडाणी लोक त्यालाच संगीत म्हणतात. नाही कुब्जे. माझं दुःख हे माझं मलाच भोगावं लागेल. मी तो भार तुझ्यावर नाही टाकू शकत." कातर स्वरात कृष्ण बोलत होता. 
"तरीही कुब्जे मी वचन देतो तुला. एक दिवस मी फक्त तुझ्या करता म्हणून या पाव्यात माझा प्राण फुंकेन आणि ते स्वर फक्तं आणि फक्तं तुझ्याच मालकीचे असतील."


हे आठवलं मात्रं आणि तिची थकलेली गात्रं शहारून गेली. त्या स्वरांचा उगम तिला कळून चुकला. इतका काळ लोटून सुद्धा तो तिला विसरला नव्हता. त्याला ती आठवत होती आणि तिला दिलेलं वचन सुद्धा. हे स्वर्गीय सूर तिचे होते. फक्त तिच्यासाठी तो पावा मंजुळ निनादत होता. या क्षणाला  फक्तं तिचाच अधिकार होता कृष्णावर. मन लावून ती ते सूर तुडुंब भरू लागली तिच्या काळजामध्ये. नदीच्या लाटा मात्रं तिच्या पायाशी लपलपत लगट करत राहिल्या. 











Sunday, March 19, 2017

मुन्तजिर

राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार  कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं  तर कधी कुणी हरल्याचं  दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.

रंजीश हि सही दिल दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोडने के लिये आ 
आला असेल तुला राग माझा मग मला दुखवायला म्हणून ये. एक आवाहन आहे इथे आव्हान नाही. एकदा ये इथे आणि बोल मला वाट्टेल ते. हरकत नाही, पण त्याच्याकरता तरी तुला यावं लागेल इथे.परत मला सोडून जाण्यासाठी ये. जे फक्त आपलं म्हणून नातं होतं ते परत पहिल्यासारखं  नाही होणार हे माहीत आहे मला. हे सांगायला का होईना पण येऊन जा.
अब तक दिल-ए-खुशफहम को है तुझसे उम्मीदे
ये आखरी शम्मे बुझाने के लिये हि आ
मनाला अजून पण तुझी आस आहे. चुकतंय हे कळतंय मला. पण हे तू स्वतः सांगितल्याशिवाय समजणार नाही मला.हा फोलपणा समजावण्याकरता तरी ये.

एक उम्र से हू लज्जत-ए-गिरिया से भी मेहरूम
ऐ राहत-ए-जान मुझको रुलाने के लिये आ
दुःखाची चव चाखून खूप काळ लोटलाय. तू आल्याशिवाय चैन नाही पडणार आता, एकदाचं मला रडवण्या करता तरी ये.
किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू अगर मुझसे खफा है तो जमाने के लिये आ 
माझी एकटेपणाची व्यथा आता किती जणांना सांगत बसू. चल माझ्यावर नाराज आहेस ना मग फक्त जगाला दाखवण्यापुरतं का असेना पण ये.


एक नितांत सुंदर अशी विनवणी आहे इथे.  स्वतःच गुंतलेले पेच स्वतःच सोडवून घेतले आहेत फक्त एका भेटी करता. पण कितीही मोहक आर्तता असली तरी ती निरर्थक आहे. एक विरंगुळा म्हणून अशी स्वप्नं बघणं ठीक आहे पण वास्तवाला सामोरं जाण्याचा क्षण आता लांबवता नाही येणार. शेवटी काळाची अशी एक शक्ती असतेच कि. सगळ्या जखमा भरून काढतो काळ. आता काही व्रण कायमचे राहून जातात त्याला इलाज नाही. अशा वेळी खुल्या दिलाने आणि स्वछ मनाने समोरच्याला निरोप देणे हेच योग्य.

यूं तो जाते हुए मैने उसे रोका भी नही 
प्यार उससे ना रहा हो मुझे ऐसा भी नही 

If you love somebody, set them free. कुणावर प्रेम करत असाल तर मोकळं सोडा त्याला. शेवटी प्रत्येकाला भुलवणारी शील वेगळी असते. मी थांबवलं नाही 'ती'ला पण माझं प्रेम नव्हतं तिच्यावर असं काही नाही.


मुन्तजिर मै भी किसी शाम नही था उसका 
और वादे पे कभी शक्स वो आया भी नही

तिने मला भेटायचं वाचन द्यावं आणि मी संध्याकाळभर तिची वाट बघत बसावं असं कधी झालं नाही आमच्यामध्ये. प्रेमात असलो म्हणून काय झालं. प्रत्येकाची अशी एक खाजगी स्पेस असते, एकमेकांच्या राज्यात अशी विनाकारण घुसखोरी कधी तिनेही नाही केली आणि मी ही.


जिसकि आहट पे निकल पडता था कल सीने से 
देखकर आज उसे दिल मेरा धडका भी नही. 

आत्ता काल-परवा पर्यंत जिच्या चाहुलीने काळजाचा ठोका चुकत होता आज तिला समोर बघून पण आत काहीच नाही हललं.  दोघांमध्ये कधीतरी फुललेल्या नात्याला समंजसपणे विराम दिलाय आता. ते हळव्या आठवणींचं, भिजलेल्या पायवाटेचं, शांत जलाशयाच्या काठी वसलेलं असं फक्त आमच्या दोघांचं असलेलं गाव एका वळणावर मागे टाकलेलं आहे आम्ही. याचा अर्थ असा नाही कि ते गाव तिथे नव्हतंच. ते तिथेच आहे अजून पुस्तकात जपून ठेवलेल्या गुलाबासारखं. भले आता ते टवटवीत राहिला नसेल पण त्याला सुवास मात्र अजूनही तितकाच जीवघेणा येतो बरंका.

 (अहमद फराझ आणि फरहात शहजाद ज्यांच्या गझलांवर वरील लेख आधारित आहे त्यांना आणि अर्थातच जगजीत सिंग आणि मेहदी हसन यांना विनयपूर्वक अर्पण )
 


 








 
 

Sunday, March 12, 2017

मरासिम

मरासिम 

अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman  घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला.
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है. 
त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं  होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे. असे सुंदर शब्द कि बोलताना सुद्धा एक नाजूक भाव मनात जागृत व्हावा.त्यात जगजीत सिंग चा आवाज म्हणजे सतारीची तार फुलांनी छेडली गेल्याचा अनुभव यावा. 
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है 
कुणी कसं  सांगावं कि एकाकी का वाटतंय ते. माणसांच्या या गर्दीत एकटेपणा हरवून जातो असं वाटतं खरं. पण तसं नसतंच मुळी. आजूबाजूला खूप लोक असतानासुद्धा मन एकटं पडतं . कारण माहीत असतं स्वतःला पण त्यावर विश्वास ठेवण्याची हिम्मत नसते आपल्यात. पण शेवटी मनातलं ओठांवर येतंच.
वो जो अपना था वही और किसीका क्यूँ है
आणि मग बांध फुटून जातो. इतके दिवस जी तक्रार मनात साचून होती ती बाहेर पडते.
यही  दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है
याही होता है तो आखिर यही  होता क्यो है
लोक म्हणतात कि हे जग असंच आहे आणि इथे असंच होतं. अरे पण का असं होतं आणि जर हे जग असंच असेल तर मुळात हे जगंच असं का आहे.


एक जरा हाथ बढा  दे तो पकडले दामन 
उसके सीने मी समा जाये हमारी धडकन

ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगलेत. मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललोय. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसतो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरलाय. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरतं. दुरून पावसाचा आवाज ऐकू येतो. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो नाजूक जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ आहे आणि नाही. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली आहे. आठवणींच्या कुपीतून त्या क्षणाचा गंध अजून दरवळतोय मनात. आज इतक्या वर्षांनी हे लिहिताना सुद्धा काटा फुललाय अंगावर आणि जगजीतचा आवाज हलकेच हृदयात मिसळतोय.
इतनी कुर्र्बत है तो फिर 
फासला इतना क्यूँ है 

एवढी जवळीक असून पण हा अंतराय कसला.



दिल-ए-बरबाद से निकला नही अब तक कोई 
एक लुटे घर पे दिया करता है दस्तक कोई 

अजून त्या दुःखातून सावरलो नाही मी. त्या जुन्या जखमेवर कोण फुंकर घालतोय कळत नाही.

आस जो टूट गयी 
फिर से बंधाता क्यूँ है 

आस तर कधीच सोडून दिली होती मी. मग आता मनाला उभारी कोण देतंय आणि का ?


तुम मसर्रत कहो या इसे  गम का रिश्ता
केहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता

या नात्याला दुःखाचं नातं म्हणा किंवा आनंदाचं. ज्या नात्याला काही नाव नव्हतंच त्याला नाव देण्याचा अट्टाहास का ? जे तिचं आणि माझं होतं ते फक्त आमचं होतं. जन्मभराची असतात हि नाती.

 है जनम का जो ये रिश्ता 
तो बदलता क्यूँ है


आणि जर जन्मभराची असतात तर का बदलतात हि नाती. उर्दू मध्ये मारासीम म्हणजे तक्रार. कैफी आझमीची हि मरासिम माझी असेल किंवा जर भाग्यवान असाल तर तुमचीही. पण ज्याच्या काळजाला अशी मुलायम जखम असते ते खरे नशीबवान. आणि जर जगजीतचा मखमली आवाज तुमच्या काळजाच्या तारा छेडत तुम्हाला गोंजारत असेल तर तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच.

Thursday, March 9, 2017

अंदाजे-गालिब


अंदाजे-गालिब 

शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ. 

ये ना थी हमारी किस्मत के विसाल-ए-यार होता
अगर और जिते रेहते, यही इंतझार होता. 

तिला भेटणं हे नशिबातच नव्हतं. अजून जगलो असतो तरी सुद्धा वाट बघत बसलो असतो. 

प्रेमभंग झालेला माणूस कायम नशिबाला दोष देत असतो. वरील शेर हे त्याचा चपखल उदाहरण म्हणता येईल. 


केहते है जिते है उम्मीद पे लोग, हमको जिने कि भी उम्मीद नही. 

आशेवर लोक जगतात असं ऐकलंय खरं, पण मला तर आता जगण्याची पण आशा नाही राहिली. 

दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द कि दवा क्या है. 
हमको उनसे वफा कि है उम्मीद, जो नाही जानते वफा क्या है. 

तुला काय झालंय वेड्या मना, या दुःखाला औषध कुठून आणू. 
आम्हाला त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे ज्याला प्रेम काय हेच माहीत नाही. 

कोई उम्मीद बर नही आती 
कोई सूरत नजर नही आती 



कुणीच दिसत नाही आता आणि काही आशा सुद्धा उरलेली नाही. 


ये मसाई-ले-तसववुफ ये तेरा बयाँ गालिब . 
तुझे हम वली समझते जो ना बादाखार होता 

किती छान बोलतोस गालिब. तुला तर आम्ही संतच समजलो असतो, जर तू मद्यपी नसतास तर. 




Sunday, March 5, 2017

भिल्ल भारत

पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता  कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे. निष्क्रिय अशा अर्जुनाला ती कर्णाची मदत घेण्यास सुचवते. अर्जुन आता दुबळ्या पेक्षा दुबळा आहे. स्वतःची लाज वाचवण्याकरता त्याला आता यःकश्चित अश्या सुतपुत्राची मदत घायला लागणार आहे.


पुढील भाग :-  सूतपुत्र हि त्या काळातील एकमेव अशी शिवी. दासींना झालेली मुले हि आपोआप सूत जमातीची म्हणून ओळखली जात. राजघराण्यातल्या लोकांची सेवा करणे, त्यांच्या घोड्याला खरारा करणे आणि त्यांची गुणगान करणारी गाणी गाणे हि त्यांच्या उदरनिर्वाहाची प्रमुख साधने. यात मेख अशी कि या दासी आपल्या मुलांचे पिता म्हणून राजाकडे बोट दाखवीत तर मुली मात्र आपल्या नवऱ्यापासून झाल्याचा दावा करीत. साहजिकच आहे आपल्या पित्यापासून निपजलेल्या मुलीकडून कुठला राजकुमार दासी म्हणून आपली सेवा करून घेईल. साहजिकच सूतपुत्र म्हणजे मातेच्या स्वैर वागणुकीमुळे जन्माला आलेला संतती असाच तत्कालीन समाजाचा दृष्टिकोन होता. सौम्य भाषेत सांगायचं झालं तर सूतपुत्र हि हरामखोर या सांप्रत शब्दाला समानार्थी अशी शिवी होती. द्रौपदीने  कर्णाला नाकारण्यामागे हे एक कारण तर होतंच. त्याहीपेक्षा सुतांच्या बायका या साहजिकच राजाच्या अथवा राजकुमाराच्या मालमत्ता बनत. जर यदा-कदाचित द्रौपदीने कर्णाला वरलं असतं तर दुर्योधनाची वाकडी नजर तिच्यावर पडली असती हे समजण्याइतकी ती बुद्धिमान आहे. साहजिकच धृतराष्ट्राचा अन्य संबंधापासून निपजलेल्या ८६ सुतापुत्रांना कौरव असा गौरव करणे हा दुर्योधनाच्या राजकारणी बुद्धीचा कळस होता आणि सुतांच्या आत्तापर्यंतच्या मानहानीकारक आयुष्यात झळाळलेला एकमेव बिंदू सुद्धा.

पण बायकांची गुपितं जशी बायकांनाच कळतात तसंच कर्ण जन्माचं गुपित हे सुद्धा द्रौपदीला कळलेलं आहे. तिच्या दृष्टीने कर्ण हा आता सूतपुत्र नसून पांडवांसारखा एक क्षत्रिय आहे. कर्ण आणि द्रौपदी यांच्यातला प्रमुख अडसर आता दूर झालेला आहे. ज्येष्ठ कौंतेय म्हणून द्रौपदी वर त्याचा अधिकार तर आहेच. पण त्याही पेक्षा तो अधिकार त्याने वापरावा हि द्रौपदी ची देखील मनोमन इच्छा आहे. हे रहस्य अर्जुनाला स्वतः हुन सांगायची तिची मनीषा नाही म्हणून  आपलं जन्मरहस्य कर्णाला  स्वतः हुन कळावं अशी तजवीज ती करते. साक्षात सूर्यपुत्र असलेल्या कर्णासमोर शेषाचा निभाव लागणार नाही हे सुद्धा ती जाणून आहे. म्हणूनच ती हतबल अश्या अर्जुनाला कर्णाची मदत मागण्यास सुचवते.

कर्णाबद्दल द्रौपदीच्या  मनात प्रेमभाव तर आहेच. पण आपल्या या अवस्थेला कारणीभूत असलेल्या कुंतीबद्दल सुद्धा तिच्या मनात राग आहे. एका हळव्या क्षणी कुंतीने आपलं मन द्रौपदी समोर उघड केलं होतं. त्याचाच वापर करून ती आता कुंतीला अद्दल घडवणार आहे. द्रौपदी च्या या एका खेळीने अनेक पक्षी मारले जाणार आहेत. तिच्या अपमानाला जबाबदार असणारे अर्जुन, कुंती आणि वांझोटा कुळाभिमान यांना तर ती धुळीला मिळवणारच आहे. पण त्याच बरोबर  ती आता कर्णाला आपल्या ताब्यात घेऊन दुर्योधनाच्या पुढच्या मानसुब्यांवर पाणी ओतणार आहे. नियतीच्या या पटावर  द्रौपदी एक प्यादी नाही तर राणी बनून धुमाकूळ घालणार आहे.

पण नियतीला हे मंजूर नाही. कर्णाची मदत मागायला गेलेल्या अर्जुनाचा वृथा अभिमान चुकीच्या वेळी जागृत होतो. ऐन वेळी तो कर्णाला सूतपुत्र म्हणून त्याचा अपमान तर करतोच वरून तो कर्णाला त्याचा बाप माहीत नसल्याबद्दल हिणवतो सुद्धा. अपमानित कर्ण त्याच्या आईला याबद्दल विचारतो तेव्हा ती बिचारी त्याला कुंतीकडे पाठवते. अखेर कुंतीकडून त्याचा जन्म रहस्य उलगडल्यानंतर तो तिची आणि पांडवांची निर्भत्सना करतो. अर्जुनाबद्दलचा त्याचा द्वेष आता पराकोटीला पोहोचलाय. त्यातच द्रौपदी त्याच्याकडे मदतीची याचना करते. नशिबाच्या या खेळामध्ये द्रौपदी एक याचक म्हणून कर्णासमोर उभी आहे. ज्याचा सूतपुत्र म्हणून धिक्कार केला त्याच्या प्रीतीची याचना करण्याएवढी अगतिक ती कधीच नव्हती. उलट ती त्याला शेषाचा काटा काढणे हा त्याचा धर्म असल्याची जाणीव करून देते. कर्णाच्या आयुष्यातला हा सर्वात दैदिप्यमान क्षण होता. आपल्या पराक्रमाने तो वासुकीचा पराभव करतो आणि शेवटच्या क्षणी त्याला जीवनदान देतो. संकटात सापडलेल्यांना मदत करणे आणि निःशस्त्र शत्रूला सुद्धा जीवनदान देणे हा क्षत्रियधर्म तो कसोशीने पाळतो.

धर्माच्या पायावर उभ्या राहिलेल्या या महाभारतात धर्माला जागणारा हा अपवादात्मक पुरुष. महाभारतातील सारीच पात्रं हि आपल्या आपल्या कर्माची फळं भोगताना दिसतात. पण या सर्वांमध्ये दुसऱ्याच्या कर्माची फळं भोगणारी कर्ण आणि द्रौपदी हि दोन पात्रं उठून दिसतात ती त्यामुळेच. म्हणूनच कदाचित मी आधी म्हटल्याप्रमाणे लाजे-काजेच्या, धर्माच्या, जातीच्या कुठल्याही जोखडापासून मुक्त असलेल्या आदिवासी जमातीला या दोघांमध्ये प्रीतीचा अंकुर फुलावा अशी अपेक्षा असेल. वरील कथा हि मूळ महाभारतात नाही. ती तशी घडली असणं शक्य आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. पण काव्यात्मक न्याय या शब्दापासून कोसो लांब असलेली हि संस्कृती या दोन पात्रांना मात्र तो न्याय देते. आणि हेच माझ्यामते त्यांचं मोठेपण आणि त्यांची प्रतिभा सुद्धा.




अवांतर:-  काही काळापूर्वी वाचनात आलेला आंतरजालावरील https://vinodviplav.wordpress.com/2011/11/25/the-rape-of-draupadi/ हा लेख या मुक्तका मागील प्रेरणा आहे. सदर लेख हा  माननीय भगवानदास पटेल यांच्या 'भील भारथ ' या संग्रहावर आधारित आहे. प्राची अश्विनी यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादात मला त्याची जाणीव करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रस्तुत लेखात मी माझ्या अल्पमती प्रमाणे भर घातली आहे. तरी हा लेख आवडल्यास त्याचे संपूर्ण श्रेय हे भगवानदास पटेल यांना देण्यात मी माझा बहुमान समजतो. हा त्यांचा अलंकार होता  आम्ही आमचा म्हणून मिरवला. जर या लेखनामध्ये काही त्रुटी वाचकांना जाणवल्या असतील तर  त्याचा दोष मी माझ्याकडे घेतो.




















Sunday, February 26, 2017

भिल्ल भारत

 भिल्ल भारत 
काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे. काही मोजके अपवाद वगळता मातृसत्ताक असलेली हि संस्कृती प्रामुख्याने स्त्रीप्रधान म्हणजेच स्त्रीला प्रमुख स्थान देत वाटचाल करत आहेत. समाजातील स्त्रियांच्या आवडी निवडीला प्राधान्य देणारा समाज म्हणून आदिवासी जमातीकडे बोट दाखवता येईल. भिल्ल भारताच्या स्त्रिया देखील त्याला अपवाद नाहीत. या महाभारतातली द्रौपदी हि मूळ द्रौपदी पेक्षा जास्त खंबीर आणि आत्मकेंद्रित आहे. त्या द्रौपदीचीच हि काहीशी अज्ञात कथा.


या कथेतली द्रौपदी हि मूळ कथेप्रमाणे पांडवांची सेवा करणारी बायको नसून एक ठाम राणी आहे. सोबतीला दासींचा लवाजमा ठेवून स्वतःची सेवा करवून घेणारी एक पट्टराणी. या दासींचं प्रमुख काम म्हणजे सतत आपल्या महाराणींचा साज शृंगार करत राहणे. द्रौपदी झोपलेली असताना तिचे केस विंचरण्याचे काम त्या इमाने इतबारे करत. अशाच एका वेळी काहीश्या धसमुसळेपणामुळे द्रौपदी चा एक केस तुटून जातो. घाबरलेली दासी तो सुवर्णपेक्षा तेजस्वी असा केस खिडकीवर ठेवून देते, जेणेकरून वारा तो उडवून लावेल आणि मालकिणीच्या दृष्टीमध्ये तिचा निष्काळजीपणा येणार नाही. लबाड वारा तो केस खोल पाताळात फेकून देतो. नेमका तो केस पडतो पाताळात निद्रा घेत असलेल्या शेषनाग अर्थात वासुकीवर. इतका तेजस्वी केस पाहूनच तो शेष द्रौपदी वर मोहित होऊन तिच्या मागावर येतो. शेषाला आपल्या दारात पाहून द्रौपदी त्याच्याकडे आकर्षित होते. दोघांचा प्रणय सुरु असताना अर्जुन यायची वेळ होते. ती शेषाला परोपरीने तिथून जायची विनंती करते. पण पुरुषार्थाचं प्रतीक असा शेष तिथून जाण्यास नकार देतो. अर्जुनाच्याच  केसांनी त्याला त्याच्याच पलंगाशी बांधून तो त्याची मानखंडना करतो. द्रौपदी कडून तो आपली सेवा करून घेतो. तिच्या हातून सुग्रास भोजन चवीने खातो. तिच्याकडून आपले अंग दाबून घेतो आणि अर्जुनाच्याच समोर द्रौपदी चा उपभोग घेतो.



हि झाली कथेची एक बाजू. पण मुळातच भिरभिरणाऱ्या वाऱ्याप्रमाणे  स्वछंद असलेली हि संस्कृती तिथल्या लोकगीतांमध्ये असे काही रंग भरते कि लाजेकाजेच्या कोशात गुरफटलेल्या आपल्या समाजाला घेरी यावी. एका आदिवासी लोकगीतानुसार अर्जुनाने सुभद्रेला पळवून आणल्यामुळे झालेल्या अपमानाने द्रौपदी भयंकर क्रोधीत झाली आहे. स्त्रीला पळवून आणण्यामध्ये पुरुषार्थ समजणाऱ्या अर्जुनातल्या क्षत्रियत्वाला ती आता त्याच भाषेत प्रत्युत्तर करणार आहे. वाऱ्याला आपल्या कटात सामील करून तीच आपल्या तेजस्वी केसांचा मोह शेषाला पडेल अशी व्यवस्था करते. कामविव्हळ असा शेष जेव्हा तिच्याकडे प्रणय सुखाची मागणी करतो तेव्हा ती त्याचाही पुरुषार्थ डिवचते. रागाने पेटून उठलेला शेष मग चिडून तिच्या समोर अर्जुनाला बांधून हतबल करून टाकतो. अर्जुनाच्या डोळ्यादेखत तो तिचा उपभोग घेतो खरा पण अपमानाच्या आगीत धगधगत असलेल्या द्रौपदी च्या खेळातला तो निव्वळ एक प्यादा आहे.

अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता  कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे. निष्क्रिय अशा अर्जुनाला ती कर्णाची मदत घेण्यास सुचवते. अर्जुन आता दुबळ्या पेक्षा दुबळा आहे. स्वतःची लाज वाचवण्याकरता त्याला आता यःकश्चित अश्या सुतपुत्राची मदत घायला लागणार आहे.


(क्रमशः)



Friday, January 27, 2017

दृष्टीकोण


 नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारा वरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला. त्या मुलाकडे पैसे नसणार, मग आत कसली देवाणघेवाण चालली होती? मी वर खाली उड्या मारत समोरच्या प्लॅटफॉर्मवर चढलो. ऑफिसमध्ये घुसणार इतक्यात तो पोरगा रडून लाल झालेले डोळे पुसत बाहेर आला.
"क्या हुआ रे?"
"उठाबशा काढायला लावल्या साल्याने. शंभर!"

Saturday, January 21, 2017

स्वरचित महाभारत : भाग शेवटचा

                                     स्वरचित महाभारत : भाग शेवटचा 

शेवटचा गाव मागे टाकून खूप वेळ झाला होता. चालून चालून त्यांच्या पायात गोळे आले होते. थोडाच वेळ आधी बर्फ पडून गेला होता. हवेतला गारवा वाढंतंच चालला होता. आणि अचानक धीरगंभीर आवाजात कोसळणारा जलप्रपात समोर आला. मंत्र टाकल्यासारखे सगळे एकाच जागी खिळून राहिले. तशी जायला दोन दगडांची वाट होती. पण एखादी उडी मारायला लागली असती. पण त्यांच्या काकडलेल्या शरीराला ती उडी सहन झाली नसती. इथून पुढे जाणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. द्रौपदी तर मटकन खालीच बसली. मग भीमानेच एक बऱ्यापैकी मोठा दगड त्या दोन दगडांवर रचला आणि त्या कामचलावू दगडावरून त्यांनी तो धबधबा पार केला. धबधब्याचे उडालेले तुषार त्यांना भिजवून गेले खरें पण न जाणो पाण्याच्या आशेनं कुणी तरी जंगली जनावर तिथे यायची शक्यता होती. जितका जमेल तितकं चालण्याचा निर्धार करून ते पुढे निघाले. भिजल्या मुळे द्रौपदीची वस्त्रं तिच्या सर्वांगाला चिकटली  होती. तिच्या कडे पाहून नकुल सहदेवाने डोळे मिचकावल्याचे अर्जुनाने पाहिले. पण त्यात वासनेपेक्षा खोडकर पणाच जास्त होता. वाटेत पठार लागल्यावर मात्रं त्यांनी रात्री तिथेच मुक्काम करायचं ठरवलं.
पांडवांनी इथून तिथून काही पाचोळा आणि काटक्या गोळा करून त्यांची चूल पेटवली. मागच्या गावात भीक मागून मिळवलेला शिधा त्यांनी त्या कुचकामी शेकोटीभोवती बसून वनभोजनाच्या थाटात खाल्ला. आकाशात तारे लुकलुकत होते. द्रौपदी ऊबेकरता म्हणून भीमाच्या मांडीवर डोकं टेकून आडवी झाली. तिला तसं बघून त्याही स्थितीत अर्जुनाला मत्सर वाटला. जणू विशेष काही घडलंच नाही असं दाखवत ते सहाही जण शिळोप्याच्या गप्पा मारू लागले.
"तू काहीही म्हण दादा! पण आपण राजवाडा सोडायलाच पाहिजे नव्हता," सहदेव म्हणाला.
"सहदेवा, वय झालं तुझं. आता तरी नसतां शहाणपणा सोडून दे. तुझ्या कुवतीच्या बाहेरच्या बऱ्याच गोष्टी आहेत जगात याचं भान ठेव. " युधिष्टिर त्याच्या नेहमीच्या शांत आवाजात म्हणाला.
"काय चुकलं सहदेवाचं ? 'पराक्रमाला' वयाचं बंधन असतं शहाणपणाला नव्हे" नकुल आपल्या भावाची कड घेत म्हणाला.
हा टोला आपल्यालाच आहे हे न समजण्याइतका अर्जुन काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता.

(क्रमशः)