Sunday, March 26, 2017

स्वरांजली


पहाट आणि रात्र या मधली वेळ. कशी कुणास ठाऊक आज अश्या अवेळी जाग आली तिला. कूस बदलून पाहते ती, पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. झोपडीचं दार उघडून ती बाहेर येते. आकाशात तारे मंद चमचमत आहेत. पहाटेच्या वाऱ्याने तिच्या अंगावर शहारा येतो. पदर गच्च आवळून घेत ती चालू लागते. कुठे जायचंय ठाऊक नाही पण ती चालू लागते. पहाटेच्या दवात भिजलेली मऊशार माती तिच्या पायाला पावलागणिक माखतेय. कसलास धुंद सुवास पसरलाय चहूकडे. त्या सुवासाने तिची आठवण जरा चाळवते. चंदनाचा सुवास. तिच्या मनात भरलाय तो वास.  आठवणींच्या कपाटात ती धुंडाळतेय काहीतरी. आणि अचानक गवसते तिला ती नेमकी स्मृती. तो मातीचा नाजूक स्पर्श हा त्या कृष्णाच्या स्पर्शासारखाच आहे की. त्या स्पर्शानेच तर नाहीसं केलं होतं तिचं कुबड. 
कुब्जा! सर्वांगाला कुबड असलेली म्हणून ती कुब्जा. पण त्या कुबड्या शरीरात कमालीची जादू होती. कंसासारखा राक्षस सुद्धा विरघळून जायचा तिच्या हस्त-स्पर्शाने. आवडती दासी होती ती कंसाची. त्याला चंदनाचं लेपन करायची अनुमती फक्तं तिलाच होती. बरं चाललेलं होतं की तिचं. आणि मग कुठूनसा तो सुकुमार कृष्ण गवसला तिला वाटे मध्ये. 
"तुझी कीर्ती ऐकून आहे मी कुब्जे. फक्तं एकदा मला तुझ्या हाताने चंदनाचा लेप लावशील ? " त्याने विचारलं होता तिला. 
खास कंसाकरता बनवलेला लेप घेऊन ती तशीच माघारी फिरली होती तिच्या झोपडीकडे. मागोमाग कृष्ण येताच होता. त्याला लेप लावताना हरपून गेली होती ती. आजपर्यंत अनेकदा गंधाळली होती तिने अपरिचित शरीरं. पण हि अनुभूती काही तरी वेगळीच होती. पुरुष स्पर्श नवा नव्हता तिला. वासना, लाचारी, क्रूरता सारं काही अनुभवलं होतं तिने या आधी पण आपुलकी नव्हती जाणवली कधी तिला. प्राजक्ताच्या कळीसारखा नाजूक असा कृष्ण तिच्याकडून लेप लावून घेत होता. कधी तो हुंकारात होता तर कधी तृप्तीची साद देत होता. एका आवेगाच्या क्षणी डोळे मिटून घेतले त्याने आणि तिने भरून घेतलं होतं त्याचं कोवळेपण डोळ्यामध्ये. 
"कुब्जे फार अलौकिक अनुभव दिलास तू मला. मी काय मोबदला देणार तुला याचा? तरीही माग तुला हवं ते. प्रयत्न कारेन मी देण्याचा"

विचारांच्या भरात ती कधी नदीकिनारी आली तिलाही समजलं नाही.कुठल्यातरी मंजुळ स्वरांनी भारून टाकला होता तो नदीकाठ. पाण्यात पाय भिजवत ती भोगत होती तो  अनुपम नाद.  त्या सुंदर क्षणांच्या साथीने तिने मोकाट सोडलं आपलं मन भूतकाळामध्ये. 

"मी तरी काय मागू कृष्णा तुला. पण तुझ्या बासरी बद्दल खूप ऐकलंय मी. हरकत नसेल तर ऐकवशील तुझा पावा मला ?" तिने विचारलं. 
"भ्रम आहे कुब्जे तो लोकांचा . एका शुष्क वेळूच्या छिद्रातून वाहणारा वारा एवढंच या आवाजाचं स्वरूप. तो नाद येतो तो या काळजातून. मनाच्या कोपऱ्यातली कुठलीतरी जखम अशी या बासरीतून बाहेर पडते. ती फुंकर या वेळूवर नाही, माझ्या मनावर घालतो मी. अडाणी लोक त्यालाच संगीत म्हणतात. नाही कुब्जे. माझं दुःख हे माझं मलाच भोगावं लागेल. मी तो भार तुझ्यावर नाही टाकू शकत." कातर स्वरात कृष्ण बोलत होता. 
"तरीही कुब्जे मी वचन देतो तुला. एक दिवस मी फक्त तुझ्या करता म्हणून या पाव्यात माझा प्राण फुंकेन आणि ते स्वर फक्तं आणि फक्तं तुझ्याच मालकीचे असतील."


हे आठवलं मात्रं आणि तिची थकलेली गात्रं शहारून गेली. त्या स्वरांचा उगम तिला कळून चुकला. इतका काळ लोटून सुद्धा तो तिला विसरला नव्हता. त्याला ती आठवत होती आणि तिला दिलेलं वचन सुद्धा. हे स्वर्गीय सूर तिचे होते. फक्त तिच्यासाठी तो पावा मंजुळ निनादत होता. या क्षणाला  फक्तं तिचाच अधिकार होता कृष्णावर. मन लावून ती ते सूर तुडुंब भरू लागली तिच्या काळजामध्ये. नदीच्या लाटा मात्रं तिच्या पायाशी लपलपत लगट करत राहिल्या. 











Sunday, March 19, 2017

मुन्तजिर

राग, मत्सर, लोभ, द्वेष, अहंकार  कुठल्याही नातेसंबंधात अपरिहार्यपणे येणारे हे भोग. कुणी कधी जिंकतं  तर कधी कुणी हरल्याचं  दाखवतं. पण साचत जातं काहीतरी आतल्या आत. घुसमट होते. तापलेल्या मनावर पुटं चढत जातात अपमानाची आणि मग कधीतरी कोंडलेली वाफ नको तिथे फुटते. पोळून निघतात मनं. मग रस्ते वेगळे होतात. दिवस जातात, वर्षं उलटतात. आणि मग एखाद्या नाजूक क्षणी जुनी पायवाट आठवते. भुरभुरणाऱ्या पावसात पसरणारा मातीचा गंध दाटून येतो छाती भरून. फिरून कुणाला तरी परत भेटावं अशी आस लागते. दूर आहे म्हणून काय झालं, शेवटी कुठलातरी चिवट बंध रेंगाळतोच मागे. त्याच रेशमी धाग्याला पकडून कुणीतरी साद घालतं.

रंजीश हि सही दिल दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोडने के लिये आ 
आला असेल तुला राग माझा मग मला दुखवायला म्हणून ये. एक आवाहन आहे इथे आव्हान नाही. एकदा ये इथे आणि बोल मला वाट्टेल ते. हरकत नाही, पण त्याच्याकरता तरी तुला यावं लागेल इथे.परत मला सोडून जाण्यासाठी ये. जे फक्त आपलं म्हणून नातं होतं ते परत पहिल्यासारखं  नाही होणार हे माहीत आहे मला. हे सांगायला का होईना पण येऊन जा.
अब तक दिल-ए-खुशफहम को है तुझसे उम्मीदे
ये आखरी शम्मे बुझाने के लिये हि आ
मनाला अजून पण तुझी आस आहे. चुकतंय हे कळतंय मला. पण हे तू स्वतः सांगितल्याशिवाय समजणार नाही मला.हा फोलपणा समजावण्याकरता तरी ये.

एक उम्र से हू लज्जत-ए-गिरिया से भी मेहरूम
ऐ राहत-ए-जान मुझको रुलाने के लिये आ
दुःखाची चव चाखून खूप काळ लोटलाय. तू आल्याशिवाय चैन नाही पडणार आता, एकदाचं मला रडवण्या करता तरी ये.
किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू अगर मुझसे खफा है तो जमाने के लिये आ 
माझी एकटेपणाची व्यथा आता किती जणांना सांगत बसू. चल माझ्यावर नाराज आहेस ना मग फक्त जगाला दाखवण्यापुरतं का असेना पण ये.


एक नितांत सुंदर अशी विनवणी आहे इथे.  स्वतःच गुंतलेले पेच स्वतःच सोडवून घेतले आहेत फक्त एका भेटी करता. पण कितीही मोहक आर्तता असली तरी ती निरर्थक आहे. एक विरंगुळा म्हणून अशी स्वप्नं बघणं ठीक आहे पण वास्तवाला सामोरं जाण्याचा क्षण आता लांबवता नाही येणार. शेवटी काळाची अशी एक शक्ती असतेच कि. सगळ्या जखमा भरून काढतो काळ. आता काही व्रण कायमचे राहून जातात त्याला इलाज नाही. अशा वेळी खुल्या दिलाने आणि स्वछ मनाने समोरच्याला निरोप देणे हेच योग्य.

यूं तो जाते हुए मैने उसे रोका भी नही 
प्यार उससे ना रहा हो मुझे ऐसा भी नही 

If you love somebody, set them free. कुणावर प्रेम करत असाल तर मोकळं सोडा त्याला. शेवटी प्रत्येकाला भुलवणारी शील वेगळी असते. मी थांबवलं नाही 'ती'ला पण माझं प्रेम नव्हतं तिच्यावर असं काही नाही.


मुन्तजिर मै भी किसी शाम नही था उसका 
और वादे पे कभी शक्स वो आया भी नही

तिने मला भेटायचं वाचन द्यावं आणि मी संध्याकाळभर तिची वाट बघत बसावं असं कधी झालं नाही आमच्यामध्ये. प्रेमात असलो म्हणून काय झालं. प्रत्येकाची अशी एक खाजगी स्पेस असते, एकमेकांच्या राज्यात अशी विनाकारण घुसखोरी कधी तिनेही नाही केली आणि मी ही.


जिसकि आहट पे निकल पडता था कल सीने से 
देखकर आज उसे दिल मेरा धडका भी नही. 

आत्ता काल-परवा पर्यंत जिच्या चाहुलीने काळजाचा ठोका चुकत होता आज तिला समोर बघून पण आत काहीच नाही हललं.  दोघांमध्ये कधीतरी फुललेल्या नात्याला समंजसपणे विराम दिलाय आता. ते हळव्या आठवणींचं, भिजलेल्या पायवाटेचं, शांत जलाशयाच्या काठी वसलेलं असं फक्त आमच्या दोघांचं असलेलं गाव एका वळणावर मागे टाकलेलं आहे आम्ही. याचा अर्थ असा नाही कि ते गाव तिथे नव्हतंच. ते तिथेच आहे अजून पुस्तकात जपून ठेवलेल्या गुलाबासारखं. भले आता ते टवटवीत राहिला नसेल पण त्याला सुवास मात्र अजूनही तितकाच जीवघेणा येतो बरंका.

 (अहमद फराझ आणि फरहात शहजाद ज्यांच्या गझलांवर वरील लेख आधारित आहे त्यांना आणि अर्थातच जगजीत सिंग आणि मेहदी हसन यांना विनयपूर्वक अर्पण )
 


 








 
 

Sunday, March 12, 2017

मरासिम

मरासिम 

अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman  घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला.
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है. 
त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं  होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे. असे सुंदर शब्द कि बोलताना सुद्धा एक नाजूक भाव मनात जागृत व्हावा.त्यात जगजीत सिंग चा आवाज म्हणजे सतारीची तार फुलांनी छेडली गेल्याचा अनुभव यावा. 
कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है 
कुणी कसं  सांगावं कि एकाकी का वाटतंय ते. माणसांच्या या गर्दीत एकटेपणा हरवून जातो असं वाटतं खरं. पण तसं नसतंच मुळी. आजूबाजूला खूप लोक असतानासुद्धा मन एकटं पडतं . कारण माहीत असतं स्वतःला पण त्यावर विश्वास ठेवण्याची हिम्मत नसते आपल्यात. पण शेवटी मनातलं ओठांवर येतंच.
वो जो अपना था वही और किसीका क्यूँ है
आणि मग बांध फुटून जातो. इतके दिवस जी तक्रार मनात साचून होती ती बाहेर पडते.
यही  दुनिया है तो फिर ऐसी ये दुनिया क्यों है
याही होता है तो आखिर यही  होता क्यो है
लोक म्हणतात कि हे जग असंच आहे आणि इथे असंच होतं. अरे पण का असं होतं आणि जर हे जग असंच असेल तर मुळात हे जगंच असं का आहे.


एक जरा हाथ बढा  दे तो पकडले दामन 
उसके सीने मी समा जाये हमारी धडकन

ऐन पावसाळ्यातला माळशेज घाट. बाकीचे मित्र मैत्रिणी इथे तिथे पांगलेत. मस्त हिरव्यागार धुक्यात ती आणि मी दोघे चाललोय. एका जलाशयाच्या काठच्या दगडावर जागा बघून आम्ही दोघे बसतो. त्या पाण्यावर पण धुक्याचा हलकासा तवंग पसरलाय. अचानक ते धुकं दाट होऊन आमच्या अवतीभोवती पसरतं. दुरून पावसाचा आवाज ऐकू येतो. मंजुळ पाय वाजवत तो पाऊस हलकेच जवळ येऊन आम्हाला मिठीत घेतो. त्या गर्द धुक्याच्या मिठीमध्ये मी, ती, तो नाजूक जलाशय आणि फक्त आमच्या करता पडत असलेला पाऊस. ती माझ्या जवळ आहे आणि नाही. एकमेकांच्या हृदयाची धडधड त्या पावसाच्या आवाजात मिसळून गेली आहे. आठवणींच्या कुपीतून त्या क्षणाचा गंध अजून दरवळतोय मनात. आज इतक्या वर्षांनी हे लिहिताना सुद्धा काटा फुललाय अंगावर आणि जगजीतचा आवाज हलकेच हृदयात मिसळतोय.
इतनी कुर्र्बत है तो फिर 
फासला इतना क्यूँ है 

एवढी जवळीक असून पण हा अंतराय कसला.



दिल-ए-बरबाद से निकला नही अब तक कोई 
एक लुटे घर पे दिया करता है दस्तक कोई 

अजून त्या दुःखातून सावरलो नाही मी. त्या जुन्या जखमेवर कोण फुंकर घालतोय कळत नाही.

आस जो टूट गयी 
फिर से बंधाता क्यूँ है 

आस तर कधीच सोडून दिली होती मी. मग आता मनाला उभारी कोण देतंय आणि का ?


तुम मसर्रत कहो या इसे  गम का रिश्ता
केहते है प्यार का रिश्ता है जनम का रिश्ता

या नात्याला दुःखाचं नातं म्हणा किंवा आनंदाचं. ज्या नात्याला काही नाव नव्हतंच त्याला नाव देण्याचा अट्टाहास का ? जे तिचं आणि माझं होतं ते फक्त आमचं होतं. जन्मभराची असतात हि नाती.

 है जनम का जो ये रिश्ता 
तो बदलता क्यूँ है


आणि जर जन्मभराची असतात तर का बदलतात हि नाती. उर्दू मध्ये मारासीम म्हणजे तक्रार. कैफी आझमीची हि मरासिम माझी असेल किंवा जर भाग्यवान असाल तर तुमचीही. पण ज्याच्या काळजाला अशी मुलायम जखम असते ते खरे नशीबवान. आणि जर जगजीतचा मखमली आवाज तुमच्या काळजाच्या तारा छेडत तुम्हाला गोंजारत असेल तर तुमच्यासारखे पुण्यवान तुम्हीच.

Thursday, March 9, 2017

अंदाजे-गालिब


अंदाजे-गालिब 

शायरी म्हटलं कि गालिबचं नाव पहिलं ओठांवर येतं. आणि त्याच्यात प्रेमभंग वगैरे असेल तर गालिबला पर्याय नाही. त्या गालिबच्या काही शेरांचा मज पामराने लावलेला अर्थ. 

ये ना थी हमारी किस्मत के विसाल-ए-यार होता
अगर और जिते रेहते, यही इंतझार होता. 

तिला भेटणं हे नशिबातच नव्हतं. अजून जगलो असतो तरी सुद्धा वाट बघत बसलो असतो. 

प्रेमभंग झालेला माणूस कायम नशिबाला दोष देत असतो. वरील शेर हे त्याचा चपखल उदाहरण म्हणता येईल. 


केहते है जिते है उम्मीद पे लोग, हमको जिने कि भी उम्मीद नही. 

आशेवर लोक जगतात असं ऐकलंय खरं, पण मला तर आता जगण्याची पण आशा नाही राहिली. 

दिले नादान तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द कि दवा क्या है. 
हमको उनसे वफा कि है उम्मीद, जो नाही जानते वफा क्या है. 

तुला काय झालंय वेड्या मना, या दुःखाला औषध कुठून आणू. 
आम्हाला त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे ज्याला प्रेम काय हेच माहीत नाही. 

कोई उम्मीद बर नही आती 
कोई सूरत नजर नही आती 



कुणीच दिसत नाही आता आणि काही आशा सुद्धा उरलेली नाही. 


ये मसाई-ले-तसववुफ ये तेरा बयाँ गालिब . 
तुझे हम वली समझते जो ना बादाखार होता 

किती छान बोलतोस गालिब. तुला तर आम्ही संतच समजलो असतो, जर तू मद्यपी नसतास तर. 




Sunday, March 5, 2017

भिल्ल भारत

पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता  कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे. निष्क्रिय अशा अर्जुनाला ती कर्णाची मदत घेण्यास सुचवते. अर्जुन आता दुबळ्या पेक्षा दुबळा आहे. स्वतःची लाज वाचवण्याकरता त्याला आता यःकश्चित अश्या सुतपुत्राची मदत घायला लागणार आहे.


पुढील भाग :-  सूतपुत्र हि त्या काळातील एकमेव अशी शिवी. दासींना झालेली मुले हि आपोआप सूत जमातीची म्हणून ओळखली जात. राजघराण्यातल्या लोकांची सेवा करणे, त्यांच्या घोड्याला खरारा करणे आणि त्यांची गुणगान करणारी गाणी गाणे हि त्यांच्या उदरनिर्वाहाची प्रमुख साधने. यात मेख अशी कि या दासी आपल्या मुलांचे पिता म्हणून राजाकडे बोट दाखवीत तर मुली मात्र आपल्या नवऱ्यापासून झाल्याचा दावा करीत. साहजिकच आहे आपल्या पित्यापासून निपजलेल्या मुलीकडून कुठला राजकुमार दासी म्हणून आपली सेवा करून घेईल. साहजिकच सूतपुत्र म्हणजे मातेच्या स्वैर वागणुकीमुळे जन्माला आलेला संतती असाच तत्कालीन समाजाचा दृष्टिकोन होता. सौम्य भाषेत सांगायचं झालं तर सूतपुत्र हि हरामखोर या सांप्रत शब्दाला समानार्थी अशी शिवी होती. द्रौपदीने  कर्णाला नाकारण्यामागे हे एक कारण तर होतंच. त्याहीपेक्षा सुतांच्या बायका या साहजिकच राजाच्या अथवा राजकुमाराच्या मालमत्ता बनत. जर यदा-कदाचित द्रौपदीने कर्णाला वरलं असतं तर दुर्योधनाची वाकडी नजर तिच्यावर पडली असती हे समजण्याइतकी ती बुद्धिमान आहे. साहजिकच धृतराष्ट्राचा अन्य संबंधापासून निपजलेल्या ८६ सुतापुत्रांना कौरव असा गौरव करणे हा दुर्योधनाच्या राजकारणी बुद्धीचा कळस होता आणि सुतांच्या आत्तापर्यंतच्या मानहानीकारक आयुष्यात झळाळलेला एकमेव बिंदू सुद्धा.

पण बायकांची गुपितं जशी बायकांनाच कळतात तसंच कर्ण जन्माचं गुपित हे सुद्धा द्रौपदीला कळलेलं आहे. तिच्या दृष्टीने कर्ण हा आता सूतपुत्र नसून पांडवांसारखा एक क्षत्रिय आहे. कर्ण आणि द्रौपदी यांच्यातला प्रमुख अडसर आता दूर झालेला आहे. ज्येष्ठ कौंतेय म्हणून द्रौपदी वर त्याचा अधिकार तर आहेच. पण त्याही पेक्षा तो अधिकार त्याने वापरावा हि द्रौपदी ची देखील मनोमन इच्छा आहे. हे रहस्य अर्जुनाला स्वतः हुन सांगायची तिची मनीषा नाही म्हणून  आपलं जन्मरहस्य कर्णाला  स्वतः हुन कळावं अशी तजवीज ती करते. साक्षात सूर्यपुत्र असलेल्या कर्णासमोर शेषाचा निभाव लागणार नाही हे सुद्धा ती जाणून आहे. म्हणूनच ती हतबल अश्या अर्जुनाला कर्णाची मदत मागण्यास सुचवते.

कर्णाबद्दल द्रौपदीच्या  मनात प्रेमभाव तर आहेच. पण आपल्या या अवस्थेला कारणीभूत असलेल्या कुंतीबद्दल सुद्धा तिच्या मनात राग आहे. एका हळव्या क्षणी कुंतीने आपलं मन द्रौपदी समोर उघड केलं होतं. त्याचाच वापर करून ती आता कुंतीला अद्दल घडवणार आहे. द्रौपदी च्या या एका खेळीने अनेक पक्षी मारले जाणार आहेत. तिच्या अपमानाला जबाबदार असणारे अर्जुन, कुंती आणि वांझोटा कुळाभिमान यांना तर ती धुळीला मिळवणारच आहे. पण त्याच बरोबर  ती आता कर्णाला आपल्या ताब्यात घेऊन दुर्योधनाच्या पुढच्या मानसुब्यांवर पाणी ओतणार आहे. नियतीच्या या पटावर  द्रौपदी एक प्यादी नाही तर राणी बनून धुमाकूळ घालणार आहे.

पण नियतीला हे मंजूर नाही. कर्णाची मदत मागायला गेलेल्या अर्जुनाचा वृथा अभिमान चुकीच्या वेळी जागृत होतो. ऐन वेळी तो कर्णाला सूतपुत्र म्हणून त्याचा अपमान तर करतोच वरून तो कर्णाला त्याचा बाप माहीत नसल्याबद्दल हिणवतो सुद्धा. अपमानित कर्ण त्याच्या आईला याबद्दल विचारतो तेव्हा ती बिचारी त्याला कुंतीकडे पाठवते. अखेर कुंतीकडून त्याचा जन्म रहस्य उलगडल्यानंतर तो तिची आणि पांडवांची निर्भत्सना करतो. अर्जुनाबद्दलचा त्याचा द्वेष आता पराकोटीला पोहोचलाय. त्यातच द्रौपदी त्याच्याकडे मदतीची याचना करते. नशिबाच्या या खेळामध्ये द्रौपदी एक याचक म्हणून कर्णासमोर उभी आहे. ज्याचा सूतपुत्र म्हणून धिक्कार केला त्याच्या प्रीतीची याचना करण्याएवढी अगतिक ती कधीच नव्हती. उलट ती त्याला शेषाचा काटा काढणे हा त्याचा धर्म असल्याची जाणीव करून देते. कर्णाच्या आयुष्यातला हा सर्वात दैदिप्यमान क्षण होता. आपल्या पराक्रमाने तो वासुकीचा पराभव करतो आणि शेवटच्या क्षणी त्याला जीवनदान देतो. संकटात सापडलेल्यांना मदत करणे आणि निःशस्त्र शत्रूला सुद्धा जीवनदान देणे हा क्षत्रियधर्म तो कसोशीने पाळतो.

धर्माच्या पायावर उभ्या राहिलेल्या या महाभारतात धर्माला जागणारा हा अपवादात्मक पुरुष. महाभारतातील सारीच पात्रं हि आपल्या आपल्या कर्माची फळं भोगताना दिसतात. पण या सर्वांमध्ये दुसऱ्याच्या कर्माची फळं भोगणारी कर्ण आणि द्रौपदी हि दोन पात्रं उठून दिसतात ती त्यामुळेच. म्हणूनच कदाचित मी आधी म्हटल्याप्रमाणे लाजे-काजेच्या, धर्माच्या, जातीच्या कुठल्याही जोखडापासून मुक्त असलेल्या आदिवासी जमातीला या दोघांमध्ये प्रीतीचा अंकुर फुलावा अशी अपेक्षा असेल. वरील कथा हि मूळ महाभारतात नाही. ती तशी घडली असणं शक्य आहे किंवा नाही हे मला माहीत नाही. पण काव्यात्मक न्याय या शब्दापासून कोसो लांब असलेली हि संस्कृती या दोन पात्रांना मात्र तो न्याय देते. आणि हेच माझ्यामते त्यांचं मोठेपण आणि त्यांची प्रतिभा सुद्धा.




अवांतर:-  काही काळापूर्वी वाचनात आलेला आंतरजालावरील https://vinodviplav.wordpress.com/2011/11/25/the-rape-of-draupadi/ हा लेख या मुक्तका मागील प्रेरणा आहे. सदर लेख हा  माननीय भगवानदास पटेल यांच्या 'भील भारथ ' या संग्रहावर आधारित आहे. प्राची अश्विनी यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादात मला त्याची जाणीव करून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. प्रस्तुत लेखात मी माझ्या अल्पमती प्रमाणे भर घातली आहे. तरी हा लेख आवडल्यास त्याचे संपूर्ण श्रेय हे भगवानदास पटेल यांना देण्यात मी माझा बहुमान समजतो. हा त्यांचा अलंकार होता  आम्ही आमचा म्हणून मिरवला. जर या लेखनामध्ये काही त्रुटी वाचकांना जाणवल्या असतील तर  त्याचा दोष मी माझ्याकडे घेतो.